April 16, 2026
IMG-20260416-WA0041

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ – मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (MASSIA) तर्फे “MSMEs साठी युरोपियन फंडिंग व सहकार्याच्या संधी” या विषयावर आयोजित विशेष जागरूकता व नेटवर्किंग सत्र उत्साहात पार पडले. बुधवारी (दि. १५) मसिआ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्थानिक उद्योगांना युरोपियन बाजारपेठ, निधी योजना, तंत्रज्ञान सहकार्य आणि निर्यातवाढीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच EduKerron International चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरॉन वैष्णव यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला.

“लोकल टू ग्लोबल”ची गरज : अर्जुन गायकवाड

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी स्थानिक उद्योगांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय संधींचा लाभ घेणे काळाची गरज असल्याचे सांगितले. युरोपियन देशांसोबत तंत्रज्ञान सहकार्य, नवकल्पना, गुणवत्तावाढ आणि निर्यातक्षमतेवर भर देत “लोकल टू ग्लोबल” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे आवाहन त्यांनी केले.

Horizon Europe व FTA मुळे नवी दारे उघडणार

EduKerron International चे CEO किरॉन वैष्णव यांनी भारत–युरोप मुक्त व्यापार करार (FTA) व Horizon Europe या महत्त्वाकांक्षी युरोपियन कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय MSMEs साठी निर्माण झालेल्या संधींचे सविस्तर विश्लेषण केले.

युरोपियन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता निकष, प्रस्ताव सादरीकरण प्रक्रिया, योग्य भागीदार शोधणे, प्रकल्प व्यवस्थापन, संशोधन व विकास (R&D) गुंतवणूक आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

स्पेनहून ऑनलाइन मार्गदर्शन

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते स्पेनमधील बार्सिलोना येथून Italian Chamber of Commerce च्या व्हाइस डायरेक्टर व EU Projects Department प्रमुख फादिया ख्रिसाता यांचे ऑनलाइन मार्गदर्शन.

त्यांनी EU–India 2030 Agenda अंतर्गत व्यापार व गुंतवणूक, टेक्नॉलॉजी व इनोव्हेशन, सुरक्षा व संरक्षण, ऊर्जा व पर्यावरण, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला.

तसेच “ट्विन ट्रान्झिशन” अर्थात ग्रीन व डिजिटल परिवर्तन, Industry 5.0, Advanced Manufacturing, Industrial Tourism यांसारख्या नव्या संकल्पनांची माहिती देत भारतीय उद्योगांनी या बदलांसोबत जुळवून घेण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.

यावेळी मसिआच्या उद्योजक प्रतिनिधी मंडळाला स्पेन व युरोप अभ्यास दौऱ्यासाठी निमंत्रणही देण्यात आले.

उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या सत्रास MSME उद्योजक, उद्योग प्रतिनिधी, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था व संबंधित घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी उद्योजकांनी युरोपियन बाजारपेठेत प्रवेश, भागीदारी संधी आणि निधी योजनांविषयी उपयुक्त माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

सातत्याने असे उपक्रम राबविण्याची मागणी

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शन सत्र मसिआने सातत्याने आयोजित करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. भविष्यातही उद्योगविकासासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे मसिआतर्फे सांगण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी उपाध्यक्ष राहुल मोगले, सचिव दिलीप चौधरी, सहसचिव रमाकांत पुलकुंडवार, कार्यकारिणी सदस्य मंगेश निटूरकर यांच्यासह उदय देशमुख, आलेश संत्रे, जनार्धन औताडे, ऋतुजा शिंदे, वैजनाथ घडलिंग, सुनील पंडित, सविता पंडित तसेच पर्यटन विभागाचे शिवाजी गायकवाड व शेख अजीमुद्दीन यांच्यासह एकूण २७ सदस्य उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!