
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :
छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर परिसरात मध्यरात्री घरात घुसून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात आकाश सुरेश काळुंखे (वय 25) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या माणीक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास आकाश काळुंखे हे आपल्या पत्नीसह सावरकर कॉलनी, प्रताप चौक, बजाजनगर येथील भाड्याच्या घरात होते. त्यावेळी दरवाजा ठोठावल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता, अनिल यांचे मित्र ऋषीकेश पाटील व तान्हाजी (पूर्ण नाव अज्ञात) हे जबरदस्तीने घरात घुसले.
यानंतर दोघांनी आकाश व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, ऋषीकेश पाटील याने हातातील लोखंडी कड्याने आकाश यांच्या कपाळावर प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कपाळावर दोन टाके पडले आहेत. तसेच आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देत तेथून पळ काढला.
घटनेनंतर आकाश यांच्या पत्नी सीमाने त्यांना तत्काळ माणीक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडिताने केली असून, एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
बजाजनगर परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

