पैठण | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सोमवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. रस्ता चुकल्याने एक कार थेट जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात कोसळल्याची घटना चांगतपुरी परिसरात घडली. या भीषण अपघातात कारमधील पती-पत्नींसह त्यांना वाचवण्यासाठी धावलेला स्थानिक तरुणही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. चालक मात्र प्रसंगावधान राखत उडी मारून बाहेर पडल्याने थोडक्यात बचावला.

📍 काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार कोरडगावकडून पैठणकडे जात होती. कारमध्ये मुकीद अहमद शेख, निलोफर मुकीद शेख आणि चालक अल्ताफ पठाण हे तिघेजण प्रवास करत होते. रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास चांगतपुरी गावाजवळील चांगदेव विद्यालयासमोर चालकाचा रस्ता चुकला.
अंधारामुळे परिसरातील रस्ता आणि पुलाचा अंदाज न आल्याने चालकाने कार रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरून खाली जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कोसळली.
😢 मदतीला धावला अन् स्वतःच वाहून गेला
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यावेळी एक स्थानिक तरुण पाण्यात उडी मारून कारमधील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, कालव्यातील तीव्र प्रवाहामुळे तोही पाण्यात वाहून गेला.
या दुर्घटनेत पती-पत्नींसह मदतीला गेलेला तरुण बेपत्ता झाला असून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
🚔 प्रशासनाची हालचाल
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. कालव्याचा प्रवाह कमी करण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधण्यात आला असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पैठण तालुक्यात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
–——————————–
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
