उद्याच्या मतदानासाठी वाळूज परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

वाळूज महानगर | प्रतिनिधी | संदीप लोखंडे
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी वाळूज परिसरात प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. एमआयडीसी वाळूज व वाळूज या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चौक, रस्ते, बाजारपेठा तसेच संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी पथसंचलन करत नागरिकांशी संवाद साधला. कोणत्याही अफवा अथवा अनुचित प्रकाराला थारा दिला जाणार नाही, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
एमआयडीसी वाळूज हद्दीत १४९ मतदान केंद्रे
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ जिल्हा परिषद गट व ९ पंचायत समिती गण अंतर्गत येणाऱ्या २२ गावांतील ४२ इमारतींमध्ये एकूण १४९ मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे.
येथे एका पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली
- ९ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक
- १७३ पोलीस कर्मचारी
- ३३ महिला पोलीस
- १७२ होमगार्ड जवान
- राखीव पोलीस दलाची एक तुकडी
- ३ स्ट्रायकिंग फोर्स पथके
असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वाळूज पोलीस ठाणे हद्दीत ७४ मतदान केंद्रे
वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जिल्हा परिषद गट व ५ पंचायत समिती गण अंतर्गत येणाऱ्या २५ गावांतील ३५ इमारतींमध्ये एकूण ७४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
येथे
- ८ पोलीस अधिकारी
- २९ पोलीस कर्मचारी
- ७० होमगार्ड जवान
तैनात असून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नियमित गस्त वाढवण्यात आली आहे.
एकूण २२३ बूथवर मतदान
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रांजणगाव, जोगेश्वरी, अंबेलोहळ, वडगाव, बजाजनगर, पंढरपूर, तिसगाव, सिडको वाळूज महानगर आदी २२ गावांमध्ये १४९ बूथ आहेत.
तर वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाळूज, शेंदूरवादा, तुर्काबाद आदी ४० गावांमध्ये ७४ बूथ आहेत.
२ लाखांहून अधिक मतदार
परिसरातील विविध गटांमध्ये एकूण २ लाख २० हजार ९०९ मतदार असून,
- रांजणगाव शेणपूंजी गट – ४४,७८८
- वडगाव को. (उत्तरे-पूर्व) – २६,४८८
- वडगाव को. (मध्य-पश्चिम) – २०,१९५
- पंढरपूर – २४,१४१
- दौलताबाद – ३३,७८०
- वाळूज – ३४,५४९
- आंबेलोहळ – ३६,९६८
मतदार आहेत.
निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन
उद्या होणाऱ्या मतदानासाठी आज दुपारी सर्व मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचवण्यात आले असून सायंकाळपर्यंत सर्वच बूथवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाळूज महानगरातील हे मतदान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील निर्णायक लढतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
॰॰॰॰
-
आषाढी एकादशीनिमित्त वाळूज-पंढरपूर परिसरात वाहतुकीचे विशेष नियोजन
Share Total Views: 570 २५ जुलैपर्यंत अनेक मार्गांवर निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
-
भरधाव कारची उभी कंटेनरला धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
Share Total Views: 370 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वाळूज महानगर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगर परिसरातील
-
राष्ट्रीय पॅरा तायक्वान्दोत रुद्र पांडेची कांस्यपदकावर मोहोर
Share Total Views: 853 पॅरा पुमसे प्रकारात महाराष्ट्रातून पदक जिंकणारा एकमेव खेळाडू न्यूज मराठवाडा वृत्तसेवा:



