न्यूज मराठवाडा वृत्तसेवा / वाळूज महानगर
कासोडा गावात जुन्या वादातून एका व्यक्तीने लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली असून या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी गंगापूर तालुक्यातील कासोडा येथील कृष्णा शिवाजी नवले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कासोडा गावात ही घटना घडली. फिर्यादी दिनाकपोपट मुलचंद नवले (वय ५२, व्यवसाय – किराणा दुकान, रा. कासोडा, ता. गंगापूर) हे त्या ठिकाणी असताना आरोपी कृष्णा शिवाजी नवले याने लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या उजव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपीने अश्लील शिवीगाळही केली.
तसेच, फिर्यादीचे चुलत भाऊ ज्ञानेश्वर यांच्यावरही आरोपीने लोखंडी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात ज्ञानेश्वर यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून आरोपीने दोघांनाही जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे कासोडा गावात भीतीचे वातावरण पसरले असून पुढील तपास सुरू आहे.
