
वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | वाळुज
हुंड्याच्या पैशांच्या सततच्या मागणीसह शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून सहा महिन्यांची गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडगाव कोल्हाटी येथील स्वास्तिक सिटी परिसरात मंगळवार (दि. 13 जानेवारी 2026) रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गोदावरी परमेश्वर घोपटे (वय 48, रा. मथुरानगर, वडगाव कोल्हाटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी पल्लवी हिचा पहिला विवाह सन 2015 मध्ये झाला होता. पहिल्या पतीचा सन 2021 मध्ये अपघाती मृत्यू झाल्यानंतर पल्लवी आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह माहेरी राहत होती. नंतर कुटुंबीयांनी तिचा दुसरा विवाह दि. 12 जुलै 2024 रोजी गोपाल अंबादास सहाने (रा. स्वास्तिक सिटी, वडगाव कोल्हाटी) याच्याशी रजिस्टर पद्धतीने केला. या विवाहात 3 लाख रुपये हुंडा व 5 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात आली होती.
फिर्यादीत पुढे नमूद केले आहे की, सप्टेंबर 2024 मध्ये पल्लवीला पहिल्या पतीच्या अपघात विम्यापोटी सुमारे 80 लाख रुपये मिळाले. ही बाब समजताच पती गोपाल सहाने याने ट्रॅक्टर खरेदीसाठी 2 लाख, चारचाकी वाहनासाठी 9 लाख रुपये घेतले. त्यानंतर घर खरेदीसाठी सातत्याने पैशांची मागणी करत पल्लवीचा छळ सुरू केला. या छळामुळे पल्लवीच्या खात्यातून अंदाजे 30 ते 35 लाख रुपये काढण्यात आले.
इतके होऊनही समाधान न झाल्याने सासरच्या मंडळींनी नणंद सिमा सहाने हिच्या लग्नासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली. पल्लवीने नकार दिल्यानंतर तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ करून 10 लाख रुपये घेण्यात आले. पुढे नणंद अर्चना जाधव व तिचा पती किशोर जाधव यांनी घर बांधकामासाठी 20 लाख रुपयांची मागणी करत पल्लवीकडून जबरदस्तीने रक्कम उकळली, असेही फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, पल्लवीवर होणाऱ्या मारहाणीबाबत तिची सहा वर्षांची मुलगी इंद्रायणी हिने आजीला वारंवार सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दि. 12 जानेवारी 2026 रोजी पती गोपाल सहाने याने पल्लवीला मारहाण केल्याचा आरोप आहे. अखेर सततच्या पैशांच्या मागणीला व छळाला कंटाळून सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या पल्लवीने मंगळवारी सकाळी 8 वाजता ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती गोपाल अंबादास सहाने, नणंद कविता कैलास चिकटे, नणंद अर्चना किशोर जाधव, नंदई किशोर जाधव व दिर समाधान अंबादास चिकटे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


