मंत्रालयात नोकरी असल्याचा बनाव करून फसवणूक
वाळूज महानगर/ न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून युवक व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशाच एका प्रकरणात मंत्रालयात नोकरीस असल्याचा खोटा बनाव करून, तलाठी पदावर नियुक्ती करून देतो असे सांगत तब्बल २० लाख रुपये घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत उध्दव हरिभाऊ नरवडे (वय ५५, रा. न्यू श्रीरामनगर, राजनगाव शे. पु. ता. गंगापूर) यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नरवडे यांच्या घरात कोमल सावके व तिचा मुलगा भाडेकरू म्हणून राहत होते. त्यांच्यासोबत राहणारा बबनराव देवकते याने स्वतःची ओळख “मी मंत्रालयात नोकरीला आहे, नोकरी व बदलीची कामे मी करून देतो” अशी करून दिली. तो किराणा दुकानातही नेहमी बसत असे. देवकते व सावके यांनी “सरकारी नोकऱ्या लावतो” असा विश्वास बसवून नरवडे यांना जाळ्यात ओढले.
नरवडे यांचा मुलगा दीपक (शिक्षण – एम.एस्सी. केमेस्ट्री) तलाठी पदासाठी अर्जदार होता. देवकतेने “१५ लाख रुपये दिल्यास तलाठी पद निश्चित लावून देतो” असे सांगितले. सुरुवातीला ५ लाख रुपये फोनपे व रोख स्वरूपात देवकते व त्याच्या साथीदारांना देण्यात आले.
यानंतर दीपकचा मित्र प्रदीप सवई यालाही याबाबत माहिती मिळाली. त्याने देखील १० लाख रुपये रोख देवकतेकडे दिले. उर्वरित रकमेची मागणी पुन्हा करत देवकतेने नरवडे यांच्याकडून आणखी पैसे घेतले. अशा प्रकारे एकूण २० लाख रुपये दिले गेले.
तलाठी पदाचा निकाल जाहीर झाला तेव्हा दीपक नरवडे व प्रदीप सवई यांचे नाव लागले नाही. याबाबत चौकशी केली असता देवकतेने “थोडा वेळ द्या, वेटिंगमध्ये आहे काम” असे सांगत वेळ मारून नेला. अनेकदा पैसे परत मागितल्यावरही तो टाळाटाळ करू लागला. शेवटी पैसे परत केले नाहीत किंवा नोकरी लावूनही दिली नाही.
या प्रकरणी उध्दव नरवडे यांनी सविस्तर जबाब देत २० लाख रुपये फसवणूक झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. देवकतेने कोमल सावके यांच्यासह संगनमताने ही फसवणूक केल्याचा संशय व्यक्त होत असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणामुळे “सरकारी नोकरी लावतो” या नावाखाली सुरू असलेल्या बनवाबनवीचे सावट पुन्हा एकदा समोर आले आहे.
- दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
- बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
- वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- कपडे काढून अमानुष मारहाण करत तरुणाला संपवल; अंबेलोहळ येथे थरकाप उडवणारी घटना
