लड्डा दरोडा प्रकरणाला दोन महिने पूर्ण…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
छत्रपती संभाजीनगर | वाळूज एमआयडीसी – सकाळी सकाळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक फोन येतो —
“बजाजनगरमध्ये घरफोडी झाली आहे… मोठा दरोडा पडलेला आहे…”
सुरुवातीला पोलिसांनी याकडे नेहमीच्या घरफोडीप्रमाणेच पाहिलं. मात्र जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा दृश्य पाहून पोलीस हादरून गेले. या घरफोडीच्या घटनेने सर्व जिल्हा हादरला होता. कारण हा ‘सामान्य’ दरोडा नव्हता — चोरट्यांनी घरातून चक्क ५.५ किलो सोने आणि ३२ किलो चांदी लंपास केलं होतं!
दरोडा पडतो आणि पोलिसांची धावपळ सुरू होते
दरोडा पडलेलं घर होतं नामांकित उद्योजक संतोष लड्डा यांचं. लड्डा कुटुंबीय सध्या विदेशात होते, आणि त्यांचा गैरहजरपणा पाहून दरोडेखोरांनी ही संधी साधली होती. घराची योग्य माहिती, CCTV अडवलं जाणं आणि मुद्देमाल नेण्यात आलेली सफाई बघता, ही अतिशय सुनियोजित योजना होती, असा पोलीसांचा अंदाज होता.
बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखा, स्थानिक राजकारणी, आणि लड्डा यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात जमा झाले.
⸻
तपास सुरू — संशयाच्या छायेत ‘जवळचा मित्र’
जशी चौकशी पुढे सरकली, तशी अनेक नावं समोर येऊ लागली. पोलिसांनी लड्डा यांच्याच ओळखीतील काही लोकांना ताब्यात घेतलं. काही दिवसांतच एक अत्यंत धक्कादायक वळण आलं — पोलिसांच्या संशयाच्या रडारवर आला लड्डांचा एक जुना, जवळचा मित्र.
ही माहिती बाहेर येताच समाजात चर्चा आणि राजकीय आरोपांची धग वाढू लागली. तपासात बीड येथून काही आरोपींना अटक करण्यात आली. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोधत असताना पोलिसांना मिळाली माहिती — अमोल खोतकर नावाचा तरुण या सगळ्या कटामागचा “ब्रेन” होता.
⸻
२६ मे — अमोल खोतकरचा एन्काउंटर
पोलिसांना माहिती मिळाली की अमोल खोतकर एका पांढऱ्या गाडीतून वाळूज परिसरात येणार आहे. गुन्हे शाखेच्या टीमने साजापूर रोडवर सापळा रचला. रात्री उशिरा अमोल गाडीतून येताच, काही मिनिटांतच गोळीबार झाला आणि सहायक पोलीस निरीक्षक गच्चे यांचेकडून अमोलचा एन्काउंटर करण्यात आला.
यामुळे गुन्हा एका वेगळ्याच वळणावर गेला — पोलीस दलावर अनेक आरोप झाले. अमोलच्या कुटुंबीयांनी हा एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप करत राजकीय पातळीवर दबाव आणला. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला.
⸻
२ महिने पूर्ण, अजूनही ‘मुद्देमाल’ बेपत्ता
अमोलच्या एन्काउंटरनंतर तपास आणखी गतिमान झाला. पोलिसांनी सुमारे २२ आरोपींना अटक केली. काही मुद्देमाल जप्त झाला — पण ५.५ किलो सोनं आणि ३२ किलो चांदी अजूनही पोलिसांच्या हाती नाही!
प्रश्न उपस्थित होतो — चोरीचं सोनं गेलं कुठं?, ते विकण्यात आलं का?, की पोलिसांनीच काहीतरी दडपलं?स् थानिकांपासून ते सोशल मीडियापर्यंत प्रत्येकजण याच प्रश्नांचं उत्तर शोधतोय.
गुन्हा: संपला नाही, फक्त खोलात गेला आहे…
हे प्रकरण आता फक्त चोरीचं राहिलेलं नाही, तर यामध्ये राजकीय हस्तक्षेप, पोलिसांवरील अविश्वास, आणि गंभीर यंत्रणात्मक त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत.
शेवटी एकच प्रश्न:
“लड्डांच्या घरातून गेलेलं सोनं आणि चांदी — नक्की कुठं आहे?”
॰॰॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


