September 26, 2026
IMG_9082

वाळूज महानगर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा बजाजनगरातील गणपती विसर्जन मिरवणुकित डीजेचा दणदणाट टाळत गणेश मंडळांनी आकर्षक देखावे आणि ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला. बजाजनगर परिसरातील १० ते १५ मोठ्या गणेश मंडळांनी डीजेऐवजी विविध सामाजिक आणि आकर्षक देखावे सादर करत मिरवणूक काढली. त्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त राहिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरुवातीला मोठ्या आवाजात डीजे वाजवणारे दोन डीजे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर मिरवणुकीदरम्यान नियमांचे पालन करण्यात आले. काही छोट्या मंडळांकडून कमी आवाजात डीजेचा वापर करण्यात आला; मात्र ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाले नसल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, बजाजनगर परिसरात विविध गणेश मंडळांकडून आकर्षक देखावे सादर करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते. प्रताप चौक येथून त्रिमूर्ती चौकमार्गे मोहतादेवी परिसराकडे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ७० ते ८० गणेश मंडळे असून, त्यापैकी जवळपास १५ मंडळांच्या मिरवणुका या मार्गावरून गेल्या.

॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!