September 23, 2026
6492e405-99fc-48e8-8d9b-4fc4078de254

अस्वच्छता, अन्नसाठवणुकीतील त्रुटी; सुधारणा नोटीसनंतरही खुलासा नाही

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगरातील वडगाव कोल्हाटी गावातील मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लि. (ब्लिंकइट) या व्यावसायिक पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी आणि त्यानंतरच्या प्रक्रियेत पेढीकडून अपेक्षित सहकार्य न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा अधिकारी श्री. प्र. श. कुचेकर यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी पेढीची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात अनेक त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

तपासणीत गोदाम व कोल्ड रूममध्ये अस्वच्छता, बुरशी व कीटकांचा प्रादुर्भाव, तसेच खाद्यपदार्थ जमिनीवर आणि भिंतीला लागून अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्याचे आढळले. अन्न, पॅकेजिंग साहित्य आणि रसायनांसाठी स्वतंत्र साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नसल्याचेही प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणी व लसीकरणाच्या नोंदी उपलब्ध नसणे, तसेच कर्मचाऱ्यांनी ॲप्रन, हातमोजे आणि हेड गियर न वापरणे, अशा त्रुटीही तपासणीत निदर्शनास आल्या. याशिवाय परिसरातील प्रकाशयोजना, कचरा विल्हेवाट आणि ग्राहक तक्रार निवारण व्यवस्थेबाबतही त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले.

या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी सुधारणा नोटीस बजावली होती. मात्र, पेढीकडून कोणताही खुलासा सादर करण्यात आला नाही. तसेच १० सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीसही पेढीचे जबाबदार प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत.

यानंतर सह आयुक्त कार्यालयाचे पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) श्री. द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम ३२ अंतर्गत अन्न परवाना निलंबित करण्याची कारवाई केली.

निलंबन काळात व्यवहारास बंदी

निलंबन कालावधीत संबंधित पेढीने कोणत्याही अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करू नये, असा आदेश देण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्री. श्रीकांत करकळे यांनी दिला आहे. तसेच संबंधित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पेढीवर देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

॰॰॰॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!