September 21, 2026
20260811_072953

टीमलीज फाउंडेशनच्या प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनप्रकरणी 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा:
वाळूज | प्रतिनिधी : बजाज ऑटो कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रशिक्षणार्थींनी जमाव करून घोषणाबाजी व गोंधळ घातल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 5.45 ते 9 वाजेच्या दरम्यान बजाज ऑटो कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर टीमलीज फाउंडेशनचे काही प्रशिक्षणार्थी जमले. कंपनीच्या बस अडवून त्यामधून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना उतरवण्यात आले. त्यानंतर कंपनीसमोर जमाव करून घोषणाबाजी व गोंधळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे कंपनीचे कामकाज विस्कळीत होऊन उत्पादनावर परिणाम झाला आणि कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक प्रवीण नामदेव गुंजाळ (वय 47) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी गणेश रमेश कावळे, प्रतीक अनिल मानकर, शुभम बाबासाहेब घोलप, जयश्री भोजराज भोंडे, दीक्षा महेंद्र वानखडे यांच्यासह एकूण 20 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135 अन्वये कारवाई सुरू केली आहे.
गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे करीत असून, पुढील तपास सुरू आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!