September 8, 2026
20260908_125516


शांतता समितीच्या बैठकीत खड्डे, पार्किंग, विसर्जन मार्ग, बेवारस वाहने, दुचाकी बंदी अन् सिडकोच्या परवानगीचा मुद्दा ऐरणीवर

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : अनिकेत घोडके


वाळूज महानगर : आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखत पार पडावा, यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. मात्र, बैठकीत केवळ शांतता-सुरक्षेपुरते विषय न राहता सिडकोची परवानगी, रस्त्यांची दुरवस्था, विसर्जन व्यवस्था, बेवारस वाहने, दुचाकी वाहतूक, पार्किंग, प्रकाश व्यवस्था आणि गणेश मंडळांना मिळणाऱ्या सुविधांवरून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.


सिडकोच्या परवानगीचा मुद्दा तापला
वाळूज महानगर परिसरातील लोकमान्य चौकातील गणेश महासंघाच्या स्टेजसाठी २४ मीटरच्या रस्त्यावर स्टेज उभारून सर्व गणेश मंडळांना सादरीकरणाची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी सिडकोकडून परवानगी नाकारण्यात आल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. यावर सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी सचिन गरड यांनी गणेशोत्सवाच्या आयोजनात अनावश्यक अडथळे आणू नयेत, अशी आक्रमक भूमिका घेत “हा स्वातंत्र्य भारत आहे, मोगलाई नाही!” असे उद्गार सिडकोच्या अधिकाऱ्यांना उद्देशून काढले. तसेच उत्सव साजरा करताना अनावश्यक खर्च टाळून संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.


‘विसर्जन मार्गावर फक्त पायी भाविकांनाच प्रवेश द्या’

विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीत दुचाकी आणि मोठी बेवारस वाहने अडथळा ठरत असल्याने ती तात्काळ जप्त करावीत, अशी ठाम मागणी विशाल खंडागळे यांनी पोलीस प्रशासनासमोर केली.


‘सर्व मंडळांना समान न्याय द्या’; विसर्जन रांगेत व्हीआयपी संस्कृतीला विरोध
गणेशमूर्ती विसर्जनाच्या रांगेत पालकमंत्र्यांच्या जवळचे मंडळ म्हणून कोणत्याही मंडळाला प्राधान्य देऊ नये, अशी मागणी एका गणेश मंडळाच्या सदस्याने केली.
गणेश मंडळांनी नियमानुसार रांगेत लागावे आणि ज्या क्रमाने मंडळे येतील, त्याच क्रमाने विसर्जनाची रांग पुढे न्यावी. कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून किंवा जवळचे मंडळ असल्याच्या कारणावरून आधी नंबर देऊ नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.


विसर्जनासाठी स्वतंत्र मार्गाची मागणी
घाणेगाव विसर्जन तलावाकडे जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे गर्दीचे नियोजन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होईल, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.


खड्डे, पार्किंग अन् स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणावे आणि रस्त्यावर कचरा साचू नये यासाठी प्रभावी स्वच्छता व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
एमआयडीसी व सिडकोच्या मुख्य रस्त्यांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, तसेच भाविकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही उपस्थितांनी केली.


१० दिवस मांसविक्री बंद ठेवण्याची मागणी
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मांसविक्री बंद ठेवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. उत्सव काळात शांतता आणि धार्मिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.


वीज वाहिन्यांजवळ बॅनरला मनाई
सुरक्षेच्या दृष्टीने वीज वाहिन्यांच्या जवळ बॅनर, होर्डिंग किंवा अन्य साहित्य लावू नये, तसेच पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गावरूनच गणेशमूर्तींच्या मिरवणुका व वाहतूक करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
गणेशोत्सवासाठी वीजमीटर जोडणी करताना स्वतंत्र अतिरिक्त चार्ज आकारला जाणार नसल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली.
‘एक मंडळ, एक पोलीस’; ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ‘एक मंडळ, एक पोलीस’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यंदा दोन बेस आणि दोन टॉप ध्वनिक्षेपकांना परवानगी असून, आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करावे लागणार असल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव हा श्रद्धा, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवाचा आनंद घेताना कायदा, सुव्यवस्था, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित
या बैठकीस नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (छावणी), रामेश्वर गाडे पोलीस निरीक्षक, सचिन गरड अर्थ व बांधकाम समिती सभापती, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह अग्निशमन दल, एमआयडीसी, महावितरण, सिडको प्रशासन तसेच विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तसेच पंचक्रोशीतील बहुतांश सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे प्रतिनिधी, नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!