October 9, 2026
rajbhog

News Marathwada | Sandeep Lokhande

छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील महाराणा प्रताप चौक परिसरातील ‘मे. राजभोग हॉटेल’चा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. ७ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या अचानक तपासणीत हॉटेलमध्ये गंभीर अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी केलेल्या तपासणीत हॉटेलला अन्न सुरक्षेच्या निकषांनुसार ८८ पैकी केवळ १८ गुण मिळाले. म्हणजेच हॉटेलला अवघे २१ टक्के गुण मिळाले असून, तपासणी अहवालात ‘अनुपालन नाही’ असा निष्कर्ष नोंदवण्यात आला. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात अस्वच्छता, खराब फरशी, कीटकांना रोखण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसणे, अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा तपासणी अहवाल उपलब्ध नसणे, तसेच कच्चे व शिजवलेले आणि अन्न योग्यरीत्या वेगळे न ठेवणे, अशा त्रुटी आढळल्या. याशिवाय रेफ्रिजरेशन, वायुवीजन, कचरा व्यवस्थापन आणि कीटक नियंत्रणाच्या व्यवस्थेतही त्रुटी असल्याचे तपासणीत नमूद करण्यात आले.

या त्रुटींमुळे अन्न दूषित होऊन ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सक्षम प्राधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके विनियम २०११ मधील तरतुदींनुसार परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.प्रशासनाच्या आदेशानुसार हॉटेलमधील अन्न उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक आणि ग्राहकांना अन्नसेवा देण्याचे काम बंद करण्यात आले आहे. सर्व त्रुटी दूर करून प्रशासनाची पुनर्तपासणी आणि निलंबन उठविण्याचा लेखी आदेश मिळेपर्यंत हॉटेल सुरू करता येणार नाही. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!