October 9, 2026
Nighttime Police Vehicle Crash Aftermath (1)

शासकीय वाहनाचे मोठे नुकसान; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

News Marathwada | Sandeep Lokhande

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील दहेगाव बंगल्याजवळ भरधाव ट्रकने पोलिसांच्या पीटर मोबाईलला जोराची धडक दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, पोलिसांच्या शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार श्याम जगताप यांच्याकडे ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ड्युटी होती. त्यानुसार ते रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलीस चालक महेश पाटील यांच्यासह पीटर मोबाईल क्रमांक MH 20 HB 9323 मधून रात्रगस्तीसाठी रवाना झाले होते. दहेगाव येथून छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्ग ओलांडत असताना छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या MH 18 BG 8267 क्रमांकाच्या ट्रकने पोलिसांच्या वाहनाला चालकाच्या बाजूने जोराची धडक दिली.

या धडकेत पोलीस वाहनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहनचालक महेश पाटील यांच्या डोक्याला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली, तर पोलीस अंमलदार श्याम जगताप यांच्या हाताला आणि बरगडीला मार लागला. अपघातानंतर दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून लिंबेजळगाव टोलनाक्याजवळील CSMSS रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती असून, या प्रकरणातील पुढील पोलीस कारवाईबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर तपशील स्पष्ट होणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!