September 29, 2026
a84edcef-a4ee-4286-93c2-3da80b5fbec6

छत्रपती संभाजीनगर, २७ सप्टेंबर : जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाच्या निमित्ताने प्रतिजैविक प्रतिकारशक्ती अर्थात Antimicrobial Resistance (AMR) बाबत जनजागृती करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

“Empowering Pharmacists for Healthier Future – Swasth Bharat, Combating Antimicrobial Resistance” या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत शहरातील विविध फार्मसी महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच फार्मसी व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

रॅलीदरम्यान नागरिकांना प्रतिजैविक औषधांचा जबाबदारीने वापर, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स न घेणे तसेच प्रतिजैविकांच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या AMR च्या धोक्याबाबत जनजागृती करण्यात आली. यासाठी विविध फलक, बॅनर आणि होर्डिंगच्या माध्यमातून संदेश देण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर विभागातील मराठवाडा, खान्देश आणि अहमदनगर विभागांतर्गत १३ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून नागरिकांमध्ये प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविरोधातील जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या रॅलीला माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्राचे माजी आमदार समीर राजूरकर, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे पदाधिकारी, विविध फार्मसी महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, या जनजागृती अभियानांतर्गत पुढील काळात विविध शैक्षणिक, जनजागृती व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली.

॰॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!